राज्यात विविध विभागांमध्ये दोन लाखाहून अधिक रिक्त पदं

मुंबई : महाराष्ट्रातल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये रिक्त पद ही एक मोठी समस्या आहे अशी कर्मचारी संघटनांची नेहमी तक्रार असते. त्या तक्रारीला पूरक अशी माहिती माहितीच्या अधिकारामधून बाहेर आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि विविध शासकीय विभागांमध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. राज्य सरकारने नितीन यादव यांना काल ही माहिती इमेल द्वारे दिली. ह्या माहिती मध्ये ३१ डिसेंबर २०१९ अखेर किती पदे रिक्त आहेत याचा तपशील देण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग आणि जिल्हा परिषदा मिळून २ लाख १९३ पदे रिक्त आहेत. सरळसेवा, पदोन्नती मिळून वेगवेगळ्या विभागासाठी १० लाख ९१ हजार १०४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८ लाख ९८ हजार ९११ पदे भरली गेली आहेत. उर्वरीत मंजुर पदाची भरती न झाल्यामुळे २ लाख १९३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये विविध महामंडळं जसं की खादी ग्राम उद्योग एसटी महामंडळ याचा समावेश नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये नोकरभरती केलेली नाही. त्याहीआधी भरती झाली नव्हती. पुढची मेगाभरती केव्हा होईल याची खात्री नाही. परंतु दोन लाख पदे रिक्त असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर अतिरिक्त पदांचा किती ताण पडतोय हे चित्र बाहेर आलो आहे.